निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

देवगिरींच्या यादवांचा नाश झाल्यावर महाराष्ट्रात आणि भारतात काही काळ खिलजी आणि तुघलक घराणे यांची अधिसत्ता होती. ही अधिसत्ता १३४७ पर्यंत टिकली. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने दिल्लीच्या या दोन राजवटींचा विचार करायचा झाल्यास या दोन्ही राजवटी लोकाभिमुख होत्या असे म्हणता येणार नाही. या राजवटिंमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होण्याऐवजी नुकसान झाले असे म्हणावे लागेल.

इ.स. १३४७ मधे दक्षिणेतील अमिरांनी बंड पुकारून आपल्यामधीलच एका सरदाराला (हसन गंगू) ला राज्यपद दिले. अशाप्रकारे बहमनीशाही(बम्मनशाही, ब्राह्मण शाही) साम्राज्याचा उदय झाला.

बहमानींचे राज्य १३४७ पासून खऱ्या अर्थाने १४८२ पर्यंत टिकले. जवळपास सर्व दक्षिण देश बहमानींच्या अमलाखाली होता. बहमानींच्या जवळपास १५० वर्षांच्या कालखंडात असे स्थैर्य त्यांना कधीच लाभले नाही. बहमानींच्य काळात परदेशी आणि दक्षिणी मुसलमान यांच्यामधील संघर्षामुळे अनेक वेळा कधी परदेशी तर कधी दक्षिणी मुसलमानांची अतिशय भयानक अशी कत्तल झाल्याचे आपल्याला आढळून येते. किंबहुना अशाच एका वादाने बहमानींचे साम्राज्य उर्जितावस्थेला आणणारा महमूद गावान याचा बळी पडला.

१४८१ साली महमूद गावान च्या झालेल्या खुनानंतर बहमनी साम्राज्याच्या विघटनास सुरवात झाली. पुढे साम्राज्याच्या ५ मोठ्या सरदारांनी स्वतःला बादशाह घोषित केले आणि बहमनी राज्याचे ५ तुकडे झाले.

मलिक अहमद निजामशहा - अहमदनगर(निजामशाही),

युसूफ आदिलखान - विजापूर(आदिलशाही),

फतेउल्लाह इमादशाह - वऱ्हाड(इमादशाही),

कासीम बेरीद- बीदर(बेरीदशाही),

कुली कुतुब उल मुल्क - गोवळकोंडा(कुतुबशाही).

अशाप्रकारे प्रश्नातील निजामशाही आणि आदिलशाही चा उदय झाला.


संदर्भ - गुलशन-ई-इब्राहीमी,



अब्दुल मुजफ्फर अल्लाद्दिन हसन बहमन शहा हा बहामनी सत्तेचा संस्थापक. त्याने राज्यकारभारास सुरुवात केली 1347 मध्ये. तो हसन गंगू या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.त्याला आणखी एक नाव आहे जफरखान असे .

त्याकाळात बहामनी साम्राज्याच्या सीमा लांब होत्या म्हणून त्यांनी त्याचे चार विभाग केले. गुलबर्गा दौलताबाद बेरार बीदर . आणि त्यांना एकेक आधिकरी नेमून दिलेला होता, आणि याच केलेल्या निर्णयाने पुढे घात झाला आणि पाच बहामनी सत्ता निर्माण झाल्या.

बहामनी साम्राज्य आणि विजयनगर हिंदू साम्राज्य च उदय एकाच काळात झाला . त्यामुळे त्यांच्यात संघर्ष साहजिकच होतं. पण विजयनगर कडून सतत मार खाणाऱ्या बहामनी साम्राज्य नें मात्रा शेवटच्या तलिकोट च लढाईत त्यांचं पाडाव केला.

1339 च भारताची नकाशा

इराणचा प्राचीन राजा बहमुन याचा तो वंशज, हे लोक झोरष्ट्रियान होते. त्यामुळे त्यांना बहमन शहा हे नाव मिळाले अशी आख्यायिका आहे. त्याने दिल्लीचा ता काळाचा सुलतान मुहंमद तुघलक याच्या सेनेचा पराभव केला.

तुघलक याची सत्ता दुबळी झाली आहे असे पाहून दक्षिणेतील अनेक यवनी सरदारांनी स्वतंत्रपणे सत्ता गाजवयाला सुरू केली . त्यांनी इस्माइल मख नावाच्या सरदाराने मुख्य बंडाळी केली त्यांची तर बंड मोडून काढण्यासाठी मुहंमद तुघलक मोठी फौज घेऊन औरंगाबाद जवळ त्याने इस्माइल मखचा दौलताबादजवळ पराभव केला. पण त्याला गुजरातेत बंड त्याच वेळी उद्भवल्यामुळे तिकडे जावे लागले. त्याची काही फौज दक्षिणेत l येथे राहिली. तेव्हा सरदार हसन गंगू याने त्या फौजेचा पराभव केला. तेव्हा इस्माइल मखने आपले पद सोडले आणि सर्व समतीने सरदारांनी हसन गंगूला सुलतान म्हणून निवडले. त्याने स्वत:ला दक्षिणेचा सुलतान म्हणून जाहीर केले आणि त्याची राजधानी गुलबर्गा येथे नेली. त्याने गुलबर्गा, कल्याणी, बिदर या क्षेत्रात राज्यविस्तार केला. बहमन शहाची सत्ता उत्तरेस मध्या प्रदेश क्या मंडूपर्यंत, दक्षिणेस रायचूरपर्यंत, पूर्वेला आंध्रात तट व पश्चिमेला दाभोळपर्यंत प्रस्थापित झाली होती. त्याने त्याच्या राज्याचा कारभारही व्यवस्थित लावून दिला.

पनवेल कल्याण वर लक्ष ठेवणारा प्रबळगड हा सुद्धा बहामनी शासकांनी बांधला

बहमन शहानंतर मृत्यूनंतर मुहम्मद शहा- पहिला सत्तेत आला (1357-1375). त्याने गोवळकोंडा च्या नायकाला ताब्यात घेतले त्याने कारभारास व्यवस्थित मांडणी केली. मुहम्मदानंतर मुजाहिद शहा, मुहम्मद शहा – दुसरा हे सत्ताधीश सत्तेत येऊन गेले. त्यानंतरचा फिरोजशहा बहामनी (1397-1422) हा महत्त्वाचा होय. फिरोजशहाने परकीय लोकांना दरबारात स्थान दिले. त्याचा अनेक भाषांचा अभ्यास होता. त्याला खगोलशास्त्रात विशेष रूची होती. त्याने दौलताबादजवळ वेधशाळा निर्माण करून, हिंदूंना मोठ्या प्रमाणात प्रशासनात जागा दिल्या. त्यानंतर अहमद शहा-प्रथम (1422-1426) सत्तेत आला. त्याने बहामनींची राजधानी गुलबर्ग्याहून बिदरला हलवली. त्यानंतर अल्लाद्दिन- दुसरा (1436-1458), हुमायुन (1457ते1461), निजाम शहा (1461-1463) , मुहम्मद शहा- तिसरा (1463 -1482), महमुद शहा (1482 ते 1518) यांनी कारभार हाकावला. इमादशही आणि निजामशाही चे संस्थापक मुख्यतः कन्नड ब्राम्हण आणि मराठी ब्राम्हण होता.

पण महमूद गवान या, सुलतानाच्या प्रधानमंत्र्याचा प्रशासनावर प्रभाव होता. त्याने साम्राज्याचा विस्तार करत असतानाच बिदरचा शैक्षणिक केंद्र म्हणून विकास केला. तसेच, इराक, इराण यांच्याशी सांस्कृतिक संबंध दृढ केले. पण त्याचा बळी दरबारातील सत्तास्पर्धेत गेला (1482). त्यानंतर बहामनी साम्राज्य पाच राज्यांत विभागले गेले (बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, बेर/वऱ्हाडची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही ही ती पाच राज्ये होती).

बहामनी सात्ते विरुद्ध आणि विजयनगर मध्ये खूप वेळ संगर्ष झाला पण विजयनगर ने नेहमीच विजय मिळवला. विजयनगरचे बहामनी सर्ते ल सोडून द्यायची किंवा तह करून देण्याच्या पद्धतीने स्वतःचा नाश केला हा भाग वेगळा. (हीच चूक पृथ्वीराज चौहान ने केली होती).

असे पण म्हणतात की रामदेवराय जर कृष्णदेवराय सारखा हुशार आणि थंड डोक्याचा असता तर कदाचित भारताचा इतिहास वेगळा असता.

तिसरा मुहम्मद च्या काळात मोहम्मद गावानं सारखा हुशार माणूस ब्बहामनी का मिळाला.

बहमनींच्या दरबारात आता महमूद गावानशिवाय दुसरा कर्ता मुत्सद्दी उरला नव्हता. खुद्द सुलतान व राजमाता यांनादेखील ही जाणीव झाली. १४६६ मध्ये सुलतानाने एक फतवा काढून महमूद गावानला वकील-ए-सल्-तनत हे पद दिले व राज्याचे सर्वोच्च अधिकार त्याच्या स्वाधीन केले. या पदावर तो १४८१ म्हणजे मरेपर्यंत होता. नंतर महमूद खल्जीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला; परंतु खेडल्याच्या लढाईत बहमनी सेनापती मलिक युसूफ तुर्क याने माळव्याच्या सैन्याचा पराभव केला बहमनी आणि खल्जी यांच्यामध्ये कायम स्वरूपाचा तह झाला.

मोहम्मद गावानं हा सर्वात हुशार शासक होता आणि त्याची त्या काळात खूप मोठे ग्रंथालय आणि विद्यालय होते.त्याची कबर आज पण बीदर मध्ये दिमाखात उभी आहे.पण मोहम्मद गावानं सोडला तर बाकीच्या शासकांनी हिंदू चे दमन च केले.विजयनगरच्या पाडाव झाल्यावर या बहामनी सत्ताधाऱ्यांनी 4 लाख ते 5 लाख हिंदू(कन्नड भाषिकांचा) हत्याकांड घडावले. मोहम्मद गावानं हा सुसंकृत आणि हुशार अभ्यासक होता. त्याकाळात त्याचा इराण इराक आणि इतर दूरच्या सत्तेशी संपर्क असायचा.पण मोहम्मद तृतीय याने त्याचा खून केला.

मोहम्मद गावानं च बीदर मधील काही इमारती

गावानने लगतची हिंदू आणि मुसलमान राज्ये यांच्यात सामोपचाराचे धोरण ठेवून वातावरणात एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने पश्र्चिम किनारपट्टीकडे मोहीम काढून तो भाग मिळविला. खेळणा, संगमेश्र्वर, विशाळगड इ. ठाणी ताब्यात घेऊन त्याने बहमनींचा कोकणपट्टीवर अंमल बसविला. १ फेब्रुवारी १४७२ रोजी बहमनी फौजांनी गोव्याचा कब्जा घेतला. कोकणपट्टीवरील विजय आणि शेजारच्या हिंदु-मुसलमान राजांशी सीमातंट्याबाबत सलोख्याचे धोरण, यांमुळे बहमनी राज्याला एक निश्र्चित दिशा आणि स्वरूप प्राप्त झाले होते. महमूद गावानच्या खुनानंतर बहमनी सत्ता कमकुवत झाली. परदेशी अमीर राजधानीत राहण्यास नाराज होते. ते आपापल्या प्रदेशांत परत फिरले. त्यांपैकी काही युसूफ आदिलखानला मिळाले. मुहंमदशाहने हसन निजामुल्मुल्क याला मलिक-ए-नायब करून राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती दिली. अखेरच्या दिवसांत गावानच्या खुनाचा त्याला पश्र्चात्ताप झाला. दारूच्या व्यसनातच त्याचा अंत झाला. त्याचा अल्पवयीन मुलगा शिहाबुद्दीन महमूद (कार. १४८२—१५१८) गादीवर आला; पण प्रत्यक्षात सर्व सत्ता कासिम बरीद या मलिक-ए-नायबच्या हाती होती. राज्याभिषेकाच्या दिवशी दख्खनी मुसलमानांनी आदिलखानला मारण्याचा कट रचला. तो उघडकीस आला. त्यातूनच पुढे सु. एक महिना बीदरमध्ये अनागोंदी माजली.

आदिलखानने विजापूरला जाण्याचे मान्य केले; तथापि मलिक-ए-नायबची कारकीर्द फारशी सुखावह झाली नाही व त्याचा बीदरच्या अंबिसिनियन राज्यपालाकडून खून झाला (१४८६). यामुळे पुन्हा परदेशी मुसलमानांचे वर्चस्व दरबारात वाढले. त्यांनी सुलतानच्या खूनासाठी कट रचला; पण तो फसला. यानंतर महमूदशाहने राज्यकारभारातील लक्ष काढून घेतले आणि शासनाची सर्व जबाबदारी कासिम बरीद या तुर्की मुख्यमंत्र्यावर टाकली. तेव्हा प्रांतीय राज्यपालांनी त्यास विरोध केला. मलिक-ए-नायबचा मुलगा मलितक अहमद निजामुल्मुल्क याने दुहीचे बीज पेरले. महमूदशाह बहमनीने राज्यातील दुफळी मिटविण्याचा प्रयत्न केला. महमूदशाहनंतर दुसरा अहमद (कार. १५१८—२१), अलाउद्दीन (कार. १५२१—२२), बलिउल्ला (कार. १५२२—२५) व कलिमुल्ला (कार. १५२५—२७) हे चार सुलतान गादीवर आले; पण ते नामधारी होते आणि खरी सत्ता अमीर बरीदकडे होती. अखेर १५३८ मध्ये बरीदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही आणि या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.

बहामनी सत्तेचा अंत (विजयनगर चे हिंदू साम्राज्य संपवणाऱ्या या बहामनी च अंत पण एकमेकांमध्ये भांडून झाला).

1.आदील शही आणि 2. कुतुब शाही च अंत मुघळांकडून 1687 मध्ये झाला

3. इमादशही का निझाम शही ने 1574 मध्या संपवले

4. बरिदशही ला आदिलशाही ने 1619 ल संपवले.

5. निझाम शहीला 1630 च्या आसपास आदिलशाही आणि मुघलांनी संपवले.

गुलबर्गा ची जामा मशीद



जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसनशाह गंगू बहमनी याने तुघलकानंतर १२ ऑगस्ट १३४७ पासून बहमनी सत्ता स्थापन केली. पुढे निजामशाह आणि आदिलशाह हे बहमनी सुलतानांकडून फुटले आणि त्यांनी आपले राज्य स्थापन केले. मलिक अहमद निजामउल्मुल्क हा बनला निजामशाह आणि युसूफ अदिलखान बनला आदिलशाह. आता हे नक्की आले कुठून आणि बादशाह झाले तरी कसे ते पाहू. फेरिश्त्याने त्यांचा इतिहास अगदी व्यवस्थित लिहून ठेवला आहे तो पुढीलप्रमाणे.

मलिक अहमद निजामशाह (पहिला निजामशाह):

अहमद निजामशाह जो पहिला निजामशाह झाला हा 'मलिक नायब बहरी' याचा मुलगा होता. हा मलिक नायब मूळचा विजयनगरचा ब्राह्मण होता. त्याचे खरे नाव 'तिमप्पा' असे होते तर त्याच्या बापाचे नाव भैरव असे होते. मलिक नायब हा अहमदशाह बहामनीच्या फौजेकडून कैद झाला. फारच लहान होता ज्यावेळी त्याला मुसलमान धर्माची दीक्षा देण्यात आली. पुढे पुढे त्याच्या कर्तबगारीचा सुलतानावर असा काही प्रभाव पडला कि आपल्या शाहजाद्याच्या महमूदच्या तैनातीला या मलिक नायबला ठेवण्यात आलं. फारसी आणि अरबी वाङ्मयावर त्याने असामान्य प्रभुत्व प्रस्थापित केले. शाहजाद्याला त्याच्या वडिलांचे 'भैरव'हे नाव घेता येत नसे त्यामुळे भैरवचे 'बहरी' झाले. म्हणून नाव मलिक नायब बहरी. हळू हळू नायब राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचला आणि त्याला 'आश्रफ हुमायून' आणि ' निजामउल्मुल्क' या पदव्या सुलतानाने दिल्या. महंमदशाह बहमनीचा मृत्यू झाल्यावर शाहजादा मेहमूद सुलतान झाला त्याने मलिक नायबला आपला वझीर केले. मलिक नायबाने आपला मुलगा 'मलिक अहमद'(हाच तो पहिला निजामशाह) याला दौलताबाद आणि वऱ्हाड याची जहागिरी दिली. मलिक अहमद हा आपल्या बापापेक्षा वरचढ निघाला. त्याने शिवनेरी, चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, पुरंदर, भोरप, मुरंजन, माहोली असे बरेच किल्ले जिंकून घेतले. मलिक नायबाच्या खुनानंतर त्याने आपल्या बापाचे सर्व अधिकार धारण केले (म्हणजेच तो 'निजामउल्मुल्क' झाला). पुढे त्याने 'अहमद निजाम उलमुल्क बहरी' असे नाव धारण केले. पुढेही त्याने बरेच पराक्रम करून आपल्या बहमनी सुलतानाला जुमानणे सोडून दिले. त्याच्या बंदोबस्तासाठी बऱ्याचजणांना पाठवण्यात आले, पण सगळे प्रयत्न निष्फळ झाले. अखेर 'भंगिरी' गावाजवळ अहमद निजाम उलमुल्कने बहामनी सेनेचा २८ मे १४९० रोजी दारुण पराभव केला. आणि आता त्याने स्वतःला निजामशाह म्हणून घोषित केलं. अशी झाली निजामशाहीची सुरुवात.

युसूफ अदिलखान (पहिला आदिलशाह):

युसूफ अदिलखान ची गोष्ट एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाला लाजवेल अशी आहे अगदी. 'युसूफ' (पहिला आदिलशाह) हा ओटोमन कुटूंबातील एका बादशहाचा मुलगा होता. याचा बाप आगा मुराद१४५१ रोजी मरण पावला. यानंतर त्याचा मोठा मुलगा मेहमूद गादीवर आला. आगा मुराद राज्य करीत असताना मुस्तफा नावाच्या माणसाने आगा मुराद ऐवजी आपणच या गादीचे वारस आहोत अशी बातमी उडवल्यामुळे राज्यात भरपूर गोंधळ माजला होता. यामुळे मेहमूद राजा होताच त्याला मंत्र्यांनी उरलेल्या सर्व शाहजाद्यांना ठार मारण्याचा सल्ला दिला. त्याचा अंमल करण्यासाठी ते युसुफच्या आईकडे आले. त्याचा गळा दाबून त्याचा खून करून त्याचा मृतदेह जाहीर करून आता अजून कोणीही वारस उरलेलं नाही हे मंत्रिगणांना सिद्ध करायचे होते. "एव्हढ्या मोठ्ठया निर्णयासाठी मला एका रात्रीची मुदत द्यावी म्हणजे मी माझी मानसिक तयारी करेन" अशी विनंती राणीने केली. मंत्र्यांनी ती परवानगी तिला दिली. या रात्रीच राणीने ख्वाजा इमादुद्दीन या सावागावाच्या एका व्यापाऱ्याला बोलावणे पाठवले. राणी नेहमी इराणमधून आणलेल्या मालाची खरेदी या व्यापाऱ्याकडून करत असे. या व्यापाऱ्याकडून राणीने एक सिरकॅशियन गुलाम विकत घेतला जो वयाने आणि दिसायला साधारण युसूफ सारखा होता. तिने बक्कळ पैसे देऊन या व्यापाऱ्याला युसुफला सावा गावी नेऊन तेथे त्याचे शिक्षण करावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी त्या बिचाऱ्या गुलामाचा युसूफ समजून मात्र हकनाक बळी गेला. युसूफ पुढे वयाची १६ वर्ष पूर्ण होईपर्यंत सावा येथेच राहिला. त्याच्या आईने त्याच्यासाठी बक्कळ पैसे आणि एक दाईसुद्धा पाठवली होती. पुढे अशी दंतकथा आहे कि एका खिज्र नावाच्या अवलियाच्या सांगण्यावरून तो इराणमधून (पर्शियामधून) हिंदुस्थानात आला. भारतात आला तेव्हा युसूफ केवळ १७ वर्षांचा होता. पुढे बहमनी राज्याचा वझीर महमूद गावान याने त्याला एक जॉर्जियन गुलाम म्हणून विकत घेतले आणि त्याला शाही शरीररक्षक म्हणून भरती केले. पुढे महमूद गवानाने युसुफला घोडदळ खात्याची सर्व कामे पाहण्यासाठी नियुक्त केलं. त्यामुळे तो बहमनी बादशाह महमद याच्या नजरेत आला. पुढे निजामउल्मुल्क (हा निजामशाह नव्हे) या एका अधिकाऱ्यांबरोबर युसुफने बरेच पराक्रम केले. निजामउल्मुल्क एका लढाईत मारला गेला असता युसुफने पुढे बराच पराक्रम दाखवला आणि बादशहाची मर्जी संपादन करून घेतली. अच्छा याच युसुफला आपल्या वरच्या मलिक अहमद निजामुल्मुल्क (म्हणजे निजामशाह) वर हल्ला करायला बहमनी बादशहाने आदेश दिला होता बर का? आणि या पठ्याने काहीतरी कारण काढून हा आदेश तर फेटाळलाच वर निजामशाहाला बातमी पाठवून सावध सुद्धा केले. महमूद बहमनी बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच प्रचलित असलेल्या युसुफला परदेशी अधिकारी आणि सैनिक यांनी पाठिंबा दिला. आता युसुफने बिदर सोडले आणि तो विजापूरला आला इथे त्याने स्वतःला युसूफ आदिलशाह म्हणून घोषित केले. आणि असा युसूफ अदिलखानचा आदिलशाह होऊन इथे आदिलशाहीची सुरुवात झाली. युसूफ अदिलखानची पार्शवभूमी फेरीस्त्याला मिर्जा महमद यांच्याकडून कळली. मिर्जा महमद म्हणजे आदिलशाह युसूफ आदिलखान याच्या वझिराचा गियासुद्दीन याचा मुलगा. कुठे सावा मध्ये शिकणारा आणि आज मारतोय कि उद्या असा विचार करणारा साधा युसूफ आणि कुठे आदिलशाह. पण बाबासाहेब पुरंदरे म्हणतात तसं भारतात आम्ही सर्वांचंच स्वागत केलं आणि त्यांना आमच्यावर राज्यही करू दिलं. बाकी पुढील इतिहास सर्वश्रुतच आहे. 

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास