शिवाजी महाराजांनी गनिमी कावा अवलंबून स्वराज्य स्थापन केले. या पूर्वी गनिमी काव्याचा उपयोग अजून कोणी केला होता? आणि कधी?
गनिमी कावा (Guerrilla Warfare) हे एक विशिष्ट प्रकारचे युद्धतंत्र आहे, ज्यात शत्रू गाफील असताना जलद गतीने हल्ला चढवला जातो आणि शत्रू सैन्य पूर्णपणे उभे होईपर्यंत जास्तीत जास्त नुकसान केले जाते.
शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. कारण गनिमी काव्यासाठी पोषक असलेला भूगोल दक्खन पठाराला लाभलेला आहे. परंतु शिवछत्रपतींना गनिमी काव्याचा उद्गाता म्हणता येणार नाही. शिवाजी महाराजांना गनिमी काव्याचं हे सूत्र त्यांचे वडील व गुरू दस्तुरखुद्द शहाजी महाराजांनी शिकवले, असे मत अनेक इतिहासकार व्यक्त करतात.
शहाजी महाराजांनी देखील गनिमी कावा वापरून दक्खनच्या भूमीत पराक्रम गाजवला. अवघी निजामशाही स्वतःच्या खांद्यावर पेलून धरली. मोघल व आदिलशाहीस एकहाती झुंज दिली. पुढे आदिलशाहीत चाकरी पत्करल्याच्या नंतर देखील दक्षिणेत पराक्रम गाजवला. परंतु, शहाजीराजे देखील गनिमी काव्याचे उद्गाते नाहीत. गनिमी काव्याचे खरे उद्गाते हे महाराजसाहेब शहाजीराजेंचे लष्करी गुरू असलेले 'मलिक अंबर' आहेत.
मलिक अंबर (१५४८-१६२७)
मलिक अंबर चा जन्म (१५४८) आफ्रिकेतील इथियोपिया नावाच्या देशात झाला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला लहान असतानाच गुलाम (slave) म्हणून विकले. पुढे चालून येमेन-बगदाद-मक्का असा प्रवास करून गुलाम म्हणूनच मलिक अंबरला भारतात आणण्यात आले. हाच गुलाम नंतर (१६०७-१६२७) निजामशाहीचा वजीर बनला. त्याने बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. दक्खनेतील महसूल यंत्रणेत सुधार केला. निजमशाहीस भरभराटीस आणले. मलिक अंबरने खडकी (म्हणजे आजचे औरंगाबाद) नावाचे शहर वसवले. शहा जहाँ ला गादीवर बसवण्यात मदत केली. दक्खनमध्ये सर्वप्रथम गनिमी काव्याचा उपयोग करण्याचे श्रेय मलिक अंबरलाच द्यावे लागेल. सम्राट अकबराच्या काळापासून चालत आलेल्या मोहिमांमुळे डळमळीत झालेली निजामशाही त्याने परत सत्तेत आणली. शहाजी महाराज हे त्याच्याच लष्करी तालमीत वाढलेले होते.
Comments
Post a Comment