पूर्व आफ्रिकेशी महाराष्ट्राचे संबंध पूर्वापार असल्याचे म्हटले जाते. त्याचे काही पुरावे सापडले आहेत का?
इतिहास प्रेमी असाल तर सिद्दी जौहर, सिद्दी मसूद ही नावे माहीतच असतील. तर हे सिद्दी म्हणजे आजच्या इथिओपिया, एरिट्रिया व इतर पूर्व आफ्रिकी देशातील लोक. त्यांना हबशी असे देखील म्हणतात. ७ व्या शतकात मुस्लीम आक्रमणासोबत हे लोक सर्व प्रथम भारतात आले. त्यानंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिश लोकांनी गुलाम म्हणून हबशी लोकांना भारतात विकण्यास सुरुवात केली. शरीराने काटक आणि मजबूत बांध्याच्या या लोकांना तत्कालीन (मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही) सैन्यात मोठी मागणी होती.
यातील काही गुलाम आपल्या कर्तृत्वावर मोठ मोठ्या पदांपर्यंत पोहोचले, यातील एक विशेष नाव म्हणजे मलिक अंबर. मलिक अंबर हा अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता.
खडकी येथे राजधानी केल्यावर मलिक अंबरने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. त्याने राबवलेल्या महसूल पद्धतींमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी झाला व वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. त्याने राबवलेली पाणीपुरवठा योजना, रस्तेबांधणी, इमारतींचे बांधकाम प्रसिद्ध आहे. खडकी म्हणजे सध्याचे औरंगाबाद शहर, जे उभे करण्याचे श्रेय मलिक अंबर या एका आफ्रिकन माणसाला जाते.
पण सिद्दी लोकांचा संबंध फक्त महाराष्ट्रापुरता नव्हता. मुघलांच्या चाकरीतील हबशी सैनिक बलुचिस्तान, सिंध, गुजरात आदी प्रांतात तर आदिलशाह आणि निझामाच्या ताब्यातील लोक महाराष्ट्र (विशेषतः कोकण), हैदराबाद, कर्नाटक या भागात स्थायिक झाले. त्यांचे वंशज आजही या भागांमध्ये आढळून येतात.
महाराष्ट्रातील जंजिरा हा अजिंक्य व अभेद्य किल्ला सिद्दींचा होता. ब्रिटिशांच्या काळात जंजिरा हे सिद्दीच्या अधिपत्याखालील एक स्वतंत्र राज्य होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे राज्य खालसा होऊन भारतात विलीन झाले.
Comments
Post a Comment