बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच गावांच्या नावात 'राजा' (उदा. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, निमगाव राजा, इ.) हा शब्द का आहे?

यासाठी आपल्याला बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या इतिहासात डोकवावे लागेल. 'सिंदखेड' येथे पूर्वी गवळी राजा सिंधुराज याची राजवट होती. त्याने रयतेच्या हिताची अनेक कामे केली. चौदाव्या शतकात वऱ्हाडवर बहामनी सत्तेचा अंमल असताना 1450 पासून सिंदखेड परगणा काझी घराण्याला जहागिरी म्हणून मिळाला होता. सोळाव्या शतकात येथील जहागिरी 'मुळे' घराण्याकडे होती.

त्यादरम्यान गावगुंड रविराज ढोणे याने बंड केले व सिंदखेडची 'देशमुखी' मिळवण्यासाठी मुळे यांच्या घराण्यातील अनेक पुरुषांना मारले. या कत्तलीतून मुळे घराण्यातील गरोदर असलेली यमुनाबाई वाचली. ती आपल्या रक्षणासाठी निजामशहाचे पंचहजारी मनसबदार असलेले लखुजी जाधव यांच्याकडे दौलताबाद येथे आली व मला बहीण मानून आपण माझे रक्षण करावे, अशी विनंती केली. त्यावेळी सिंदखेडचा परगणा हा लखुजी जाधव यांच्याकडेच होता. त्यांनी रविराज ढोणे याचा बिमोड करण्याचे ठरवले. लखुजी राजे दहा हजार सैन्य घेऊन भाऊ जगदेवरव यांच्यासह सिंदखेडला आले. त्यांनी जनतेची विचारपूस केली. जनता आधीच ढोणेच्या क्रौर्याने त्रस्त झाली होती.

सर्व हकिकत ऐकल्यावर लखुजी राजांनी ढोणेच्या गढीवर हल्ला केला. त्यात ढोणे ठार झाला. गढीतील बायका, मुलांना लखुजी राजांनी संरक्षण दिले. परंतु त्यानंतर यमुनाबाईच्या कुटुंबात देशमुखी पाहणारा कुणीही पुरुष राहिला नव्हता. त्यामुळे यमुनाबाईने लखुजी जाधवांना इ.स. 1576 ला सिंदखेडची 'देशमुखी' दिली.

लखुजी राजांना देशमुखी मिळाल्यानंतर ते सिंदखेडला वास्तव्यास आले. त्यांनी येथे अनेक विकासकामे केली. त्यामुळे व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली. परिणामी सिंदखेडचे वैभवही वाढले. त्यांनी राहण्यासाठी भव्य राजवाडा बांधला. अनेक पेठा वसवल्या. सिंदखेड येथून लखुजी राजे आपला कारभार बघायला लागले. जनतेप्रती प्रेम आणि कर्तबगारीमुळे ते लोकप्रिय झाले.

यादरम्यान लखुजी जाधवांना निजामशहाकडून दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन मिळाले. लखुजी जाधवांचे दहा हजार सैनिक येथेच राहायला लागले. त्यावेळी सिंदखेडची लोकसंख्या जवळपास चाळीस हजार इतकी होती. सिंदखेडला राजधानीचे स्वरूप आले.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंदखेड हे आजोळ. राजमाता जिजामाता यांचे जन्मस्थान. सिंदखेड पासून 13 किलोमीटर अंतरावर देऊळगाव राजा, मेहुणा राजा, किनगाव राजा व अडगाव राजा या चार गावांमध्ये किल्ले आहेत. ही चारही गावे सिंदखेडच्या चारही दिशांना आहेत. या सर्व किल्ल्यांचे बांधकाम लखुजी राजांच्या कार्यकाळात झाले आहे. सिंदखेडवर हल्ला झाला तर शत्रूला चारही बाजूने कोंडीत पकडता यावे, यासाठी हे किल्ले बांधण्यात आले. लखुजी राजे स्वतः पराक्रमी व बुद्धिमान होते. 'वऱ्हाड'चा कारभार ते स्वतः पाहत असत.

चारही किल्ले बांधून झाल्यावर लखुजी राजांनी तेथील जहागिरी चार मुलांना दिली. देऊळगाव राजा येथे दत्ताजी, मेहुणा राजा येथे अचलोजी, किनगाव राजा येथे बहादूरजी आणि अडगाव राजा येथे रघुजी यांना जहागिरी दिली. येथे राजांचे वास्तव्य असल्यामुळे या चारही गावांची 'राजा' अशी नावे पडली. म्हणून या गावांच्या नावाचा उल्लेख करताना आजही 'राजा' हा शब्द वापरला जातो.

सिंदखेडच्या बाजूचे चारही किल्ले

  • अडगाव राजा- सिंदखेड राजापासून 13 किमी अंतरावर अडगाव येथे एक किल्ला आहे. येथे लखुजीराव जाधव यांचा मुलगा रघुजी याची जहागिरी होती. या किल्ल्याचा मुख्य उपयोग शस्त्रसाठा ठेवण्यासाठी केला जात असे.
  • देऊळगाव राजा- महाराष्ट्राचे तिरुपती म्हणून नावारूपास आलेल्या देऊळगाव राजा येथे बालाजीचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे लखुजीराव जाधवांचा मुलगा दत्ताजीची जहागिरी होती.
  • किनगाव राजा- लखुजीराव जाधव यांचे बंधू भुलजी यांना मुलगा नव्हता. त्यांनी लखुजींचा मुलगा बहादूरजीला दत्तक घेतले. बहादूरजीची येथे जहागिरी होती. त्यांचे वंशज अजूनही येथे राहतात.
  • मेहुणा राजा- हे ठिकाण संत चोखामेळा यांची जन्मभूमी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथे एक किल्ला होता. राजे लखुजी जाधवांचा मुलगा अचलोजी याला येथील जहागिरी दिली होती. अचलोजीचे याठिकाणी वास्तव्य होते.
हे आपल्या प्रश्नाचे उपयुक्त उत्तर होते?
Sumit Ravi Sarwade साठी प्रोफाइल फोटो
टिप्पणी समाविष्ट करा…
श्रीधर गोतरकर साठी प्रोफाइल फोटो

छान व रोचक माहिती दिली👍👍

सतीश राजगुरे साठी प्रोफाइल फोटो
नंदकिशोर बोधक साठी प्रोफाइल फोटो

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास