हैदराबादच्या निजाम राज्याची स्थापना कोणी केली?मूलतः उत्तर दिले: हैद्राबादच्या निजाम राज्याची स्थापना कोणी केली?
शिवाजी महाराजांच्या काळात पाच पातशाह्या होत्या त्यामधील निजामशाही व ही निजामशाही वेगळी आहे. बरेचजण नामसाधर्म्यामुळे गल्लत करू शकतात.
हैदराबादची निजामशाही ही निजाम उल्म मुल्क याने स्थापन केली. ती 1724/1725 साली. तेव्हापासून लवचीकता दाखवून निजामशाही टिकून राहीली ती हैदराबाद संस्थान 1948 मधे स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत.
सदर निजामाचा पणजा हा आलमशेख समरकंद येथे होता. त्याचा मुलगा म्हणजे निजामाचा आजा ख्वाजा आबीद हा बुखार्याहून हिंदूस्तानात आला व औरंगजेबाच्या चाकरीत रूजू झाला. त्यावेळेस औरंगजेब राजपुत्र होता व पुढे होणार्या सत्ता स्पर्धेमधे ख्वाजा आबीद सारख्या हुशार, लढवय्ये पण निष्ठावान व्यक्तींची गरज होती. पुढे औरंगजेब बादशहा झाल्यावर हे घराणे उदयास आले. सदर निजामाचे वडील मीर शहाबुद्दीन हा दख्खन व गुजरातचा सुभेदार होता.
सदर निजामाचे मुळ नाव चीन किलीच खान. याचा जन्म 1671 सालचा तर मृत्यू 1748 सालचा. असे त्याला दिर्घायुष्य लाभले. औरंगजेबाच्या मागून जे गादीवर बसले ते मुख्यत्वे सय्यद बंधूंच्या पाठींब्यावर. पुढे बादशहास सय्यद बंधूंचे वर्चस्व सहन न झाल्याने त्यांचा पाडाव करण्यात आला. सय्यद बंधूंचे वर्चस्व असताना त्यांच्याशी मिळवून घेणे व संधी मिळाली तेव्हा बादशहाच्या संमतीनेच सय्यद बंधूंचा काटा काढणे ही चतुराई निजामाने दाखवली. निजामास संपवण्यासाठी सय्यद बंधूंनी त्यांचे पुतणे दिलावर अली व अलीम अली यांना सैन्यासह पाठवले. परंतु, ते दोघे एकत्रीत हल्ला करण्याची चपळता व समन्वय दाखवू शकले नाहीत. निजामाने दोघांनाही वेगवेगळे गाठून लढाईत हरवले व मारले. या दोनही लढाया त्याने त्याचेकडील अद्ययावत असा तोफखाना व युद्धभुमीवरील सरस अशी रणनीती या जोरावर जिंकल्या. निजामाकडे फ्रेंच कर्नल बुसी याने बनवलेला अद्ययावत असा तोफखाना होता.
त्यानंतर दरबारात निजाम एक प्रमुख व्यक्ती व वजीर बनला. परंतु, तेव्हाचा बादशहा मुहम्मद (रंगीला हे त्याचे टोपण नाव) बेशिस्त व रंगेल होता. त्याचे व शीस्तप्रीय निजामाचे नीट जमेना. निजाम वजीरपद सोडून निघाला व दक्षीणेकडे निघाला. ही बंडाची हालचाल बघून बादशहाने तेव्हाचा दख्खनचा सुभेदार मुबारीज खान यांस निजामाचा नायनाट करायची आज्ञा केली. या साखरखेर्डा (लोणार जवळील) लढाईत परत तोफखाना व सरस युद्धतंत्राच्या जोरावर निजामाने मुबारीजखानास हरवले. मुबारीज खानाचे दोनही मुलगे पहील्या दिड तासात मारले गेले. पुढे मुबारीज खानसुद्धा मारला गेला. निजामाने मुबारीज खानाचे मुंडके बादशहाकडे पाठवले व निरोप पाठवला की “बंडखोरास शासन केले आहे”. बादशहापुढे दुसरा पर्याय उपलब्ध राहीला नव्हता म्हणून निजामाचा हा प्रमाद दुर्लक्ष करून बादशहाने निजामाचा ‘असफजहा’ अशी पदवी देउन सन्मान केला. शिवाय निजामास दख्खन ची सुभेदारी बहाल केली.
अशा प्रकारे निजामशाही अर्थात ‘असफजहा’ घराण्याची राजवट सुरू झाली ती 1724 मधे. 1725 मधे निजामाने औरंगाबाद ही दख्खनची राजधानी हैदराबादला हलवली. मराठी राज्यापासून दुर जाणे हा एकमेव उद्देश होता. त्याने उघडपणे मुगल बादशहापासून बंड करून स्वतंत्र राज्य असं कधीच घोषीत केलं नाही. पण 1725 पासून हैदराबाद येथून वरवर मुगलांचा अंकीत/सुभेदार पण प्रत्यक्षात स्वतंत्र असा कारभार सुरू केला.
निजाम कमकुवत असताना बाजीराव पेशव्यांस 4 वेळा भेटला. 4 थी भेट कर्नाटक मोहीमे दरम्यान सिरा या ठीकाणी झाली. परंतु, निजामाने नंतर रंग दाखवण्यास सुरूवात केली. कोल्हापूरच्या संभाजी राजेंना चिथावणी देउन शाहू महारांजांवर संयुक्त मोहीम आखली. यावेळेस बाजीराव पेशव्याने (पालखेड लढाईत) निजामास चारी मुंड्या चीत केले. निजामाने मुंगी शेवगाव येथे अपमानास्पद अटी स्वीकारून बाजीरावाशी शरणागती पत्करली. पुढे 1736 मधे परत बाजीराव पेशव्याने भोपाळच्या लढाईत निजामाचा सपशेल पराभव केला. पानीपत युद्धानंतर निजामाने परत डोके वर काढल्यावर थोरले माधवराव पेशवे यांनी राक्षसभुवनच्या लढाईत निजामाचा सपशेल पराभव केला. परंतु, राजकारणाचा भाग म्हणून किंवा इतर काही कारण असेल बाजीरावाने किंवा माधवरावाने निजामास संपूर्ण संपवले नाही. पुढे इंग्रजांशी लढताना पेशवाई संपली मात्र निजामाने (त्याच्या वंशजांनी) इंग्रजांशी मिळते जुळते घेउन राज्य/संस्थान टिकवून ठेवले.
निजामाने मृत्युपुर्वी एक 17 कलमी पत्र किंवा राज्य कसे चालवावे असे आदेश लिहून ठेवले होते. त्यानुसार पुढे राज्यकारभार केला गेला.
फोटो गुगलवरून घेतला आहे
Comments
Post a Comment